MHADA Homes Mumbai : मुंबई, पुणे तसेच आसपासच्या उपनगरांमध्ये सर्वसामान्यांना बजेटमध्ये बसतील, चांगलं क्षेत्रफळ असलेली आणि राहण्यास योग्य घरं उपलब्ध करून देण्यात म्हाडाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. मात्र, या घरांसाठीचा अर्ज दाखल करण्यापासून ते त्याची छाननी पूर्ण होईपर्यंत अनेक कठोर निकष आणि नियमांची पूर्तता करावी लागते. या प्रक्रियेत काही अर्ज प्राथमिक टप्प्यातच बाद देखील होतात. पण आता म्हाडाने एका महत्त्वाच्या अटीमध्ये मोठा बदल करत शिथिलता दिली आहे. त्यामुळे म्हाडाच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. म्हाडाने केलेल्या या बदलामुळे नक्कीच अनेकांना म्हाडाचे घर (Mhada Flat) मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हाडाचे स्वस्तात मस्त घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा..
म्हाडाच्या या निर्णयानं सर्वसामान्यांना फायदा
आता स्वतःच्या नावावर घर असलं तरीही म्हाडाचं घर घेण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. याचा अर्थ, मुंबईत खाजगी मालकीचं, म्हाडाचं किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेतून घेतलेलं घर आधीपासून असलं, तरीही पुन्हा एकदा मुंबईत म्हाडाचं घर खरेदी करण्याची संधी इच्छुकांना मिळणार आहे. या नियमातील बदलामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळणार असून, एकाच वेळी दोन घरांची मालकी असणं आता अधिक सोपं आणि शक्य होणार आहे.
सोडतीत वारंवार अर्ज करूनही ज्यांना घर मिळालं नाही, अशा अर्जदारांसाठी म्हाडानं विशेष दिलासा देत, न विकल्या गेलेल्या घरांच्या विक्रीसाठी ही अट शिथिल केली आहे. ही घरं आता ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा महत्त्वपूर्ण निर्णय म्हाडा मुंबई मंडळाकडून घेण्यात आला असल्याची माहिती आहे.
या योजनेअंतर्गत साधारण 100 घरं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार असून, येत्या 10 दिवसांत याबाबत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर इच्छुक नागरिकांना थेट घर खरेदीसाठी अर्ज करता येणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून हक्काचं घर मिळवण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत.
सोडतीला बायपास देत म्हाडाच्या घरांची थेट विक्री…
म्हाडाची ही घरं यापुढे सोडतीच्या प्रक्रियेशिवायच विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये ज्या अर्जदाराकडून सर्वात आधी अर्ज दाखल केला जाईल आणि अनामत रक्कम भरली जाईल, त्यालाच घराचा प्राधान्याने हक्क मिळणार आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी म्हाडानं अनेक महत्त्वाच्या अटींमधील जाचक निकष शिथिल केल्याचंही जाहीर केलं आहे.
मुंबईतील ताडदेव परिसरात असलेल्या क्रिसेंट टॉवरमधील तब्बल 7 कोटी रुपये किमतीची 7 आलिशान घरं अद्याप विक्रीविना आहेत. याशिवाय पवईतील तुंगा भागातील मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठीची निवासस्थानं देखील अजून ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये बहुतांश घरं ही मध्यम आणि उच्च वर्गासाठीची आहेत.
या घरांसाठी इच्छुकांनी अनामत रक्कम जमा करताच तातडीने ताबा मिळणार आहे. अर्ज करताना उत्पन्नाची अट, इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तत्सम जटिल कागदपत्रांची आवश्यकता असणार नाही. फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रहिवासी पुरावा इतकी कागदपत्रं पुरेशी ठरणार आहेत. त्यामुळे आता ‘ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या ऑफर अंतर्गत ही सुवर्णसंधी कोणाच्या नशिबी पडते, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
महत्त्वाची प्रश्न आणि उत्तरे
प्रश्न – म्हाडाच्या कोणत्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार?
उत्तर – म्हाडानं एका महत्त्वाच्या नियमात बदल करून मोठी सवलत दिली आहे. आता अर्जदाराच्या नावावर आधीच घर असलं तरीही तो म्हाडाचं घर खरेदी करू शकणार आहे. त्यामुळे मुंबईत खाजगी मालकीचं किंवा कोणत्याही सरकारी योजनेतून मिळालेलं घर असलेल्या नागरिकांनाही म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
प्रश्न – या नियमातील सवलतीचा फायदा नेमका कोणाला होणार?
उत्तर – जे नागरिक वारंवार म्हाडा सोडतीत सहभागी होऊनही घर मिळवण्यात अपयशी ठरले, किंवा ज्यांनी दोनपेक्षा अधिक वेळा नशीब आजमावूनही घर हाती लागलं नाही, अशा सर्व इच्छुकांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे.
प्रश्न – म्हाडाकडून एकूण किती घरं विक्रीस काढली जाणार आहेत?
उत्तर – म्हाडा मुंबई मंडळातर्फे जवळपास 100 घरं विक्रीसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात पुढील 10 दिवसांत प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर थेट विक्री प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे.
Please. Iam interested in mahada flats